रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर परिसरात विजेच्या धक्क्याने एका ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घराजवळ साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी पंप सुरू करत असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चंद खेत्री (वय ३४, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) हे भंगार खरेदीचा व्यवसाय करत होते. सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामगार सलमान काशीम शेख आणि रमेश मिलिंद सावंत यांच्यासोबत टेम्पो घेऊन भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास ते काम संपवून घरी परत आले.
घरासमोर पावसाचे पाणी साचल्यामुळे ते काढण्यासाठी त्यांनी पंपाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पंपाचा ‘फूट वॉल्व्ह’ हाताने खाली दाबण्यासाठी ते गेले असताना, त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते फेकले गेले आणि जागीच बेशुद्ध पडले.
कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना चिंतामणी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान डॉ. मारुती पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे खेत्री कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी उद्यमनगर येथे विजेच्या धक्क्याने 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू






