GRAMIN SEARCH BANNER

बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांचावरचा ‘अविश्वास’ ठरला निष्फळ!

Gramin Varta
179 Views

गुहागर: तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर रद्द करण्यात आला आहे. एकूण चार सदस्यांनी लांजेकर यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना मूठमाती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

झोंबडी ग्रामपंचायतीतील काही सदस्यांना विश्वासात घेऊन विरोधकांनी सरपंचांविरोधात ३० सप्टेंबर रोजी गुहागर तहसील कार्यालयाकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सोमवारी  तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच तहसीलदारांनी सरपंचांवरच्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावातील विषयांवर चर्चा सुरू केली. यावेळी, सरपंच लांजेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या रुक्सार हुसैन ममतुले या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरल्याची नोंद घेण्यात आली.

त्यानंतर अर्जातील विषय क्र. १, २, आणि ३ वर सदस्यांचे मत विचारण्यात आले. उपस्थित सदस्यांनी सरपंचांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सदरचा अर्ज आपण स्वतः लिहिलेला नाही, तर काही ग्रामस्थांनी आपल्याकडून सह्या करून घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सरपंचांनी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी सूचक म्हणून मयुरी महेश लांजेकर, तर अनुमोदक म्हणून प्रणाली प्रदीप पवार यांनी भूमिका बजावली. सरपंचांच्या बाजूने प्रणाली प्रदीप पवार, मयुरी महेश लांजेकर, जैनब अब्दुलवहिद ममतुले, आणि अतुल अनंत लांजेकर यांनी मतदान केले. यामुळे अतुल लांजेकर हेच पुन्हा झोंबडी सरपंच म्हणून कार्यरत राहणार असल्याचे या सभेत जाहीर करण्यात आले.

Total Visitor Counter

3370039
Share This Article