गणपतीपुळे / वैभव पवार : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील चॅम्पियन ‘गोल्डन बॉय’ कु. संगम सुयोग चव्हाण याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे.
त्याच्या या यशाची दखल घेत उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संगमच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी संगमच्या आगामी खेळातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “प्रत्येक स्पर्धेसाठी आवश्यक असलेली सर्व मदत देण्यासाठी आम्ही कायम पाठीशी उभे राहू,” अशी ग्वाही दिली.
या सन्मान सोहळ्याचे आयोजन कोतवडे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख स्वप्निल (तारक) मयेकर यांच्या शिफारसीने, तसेच युवासेना विभागप्रमुख अमित घनवटकर आणि गणपतीपुळे शाखाप्रमुख महेश चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
फक्त १४ वर्षांच्या वयात संगम चव्हाणने आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. “मूर्ती लहान पण कीर्ती महान” या उक्तीला साजेसा ठरलेला हा चॅम्पियन भविष्यात एक दर्जेदार खेळाडू म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख प्रदीप (बंड्या) साळवी, राजेंद्र महाडिक, राजन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपतीपुळे : राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संगम चव्हाणचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव!







