GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर; नौसीन काझींच्या मध्यस्थीने तात्पुरती स्थगिती

Gramin Varta
306 Views

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अतिक्रमणांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विमानतळ मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी शुक्रवारी सकाळी कोकणनगर परिसरात नगर परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई राबवली. ३० मीटर रुंदीच्या मंजूर रस्त्यामध्ये अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे यावेळी जमीनदोस्त करण्यात आली. नगराध्यक्षांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

शुक्रवारी सकाळी नगर परिषदेचे पथक जेसीबी आणि पोलिसांच्या ताफ्यासह अचानक कोकणनगरमध्ये दाखल झाले. या अनपेक्षित कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिक आणि गाळेधारकांची मोठी तारांबळ उडाली. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ही बांधकामे काढण्याचे काम सुरू होताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानांमधील महत्त्वाचे आणि महागडे साहित्य बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने गोंधळ उडाला होता.

या कठीण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांची बाजू मांडली. मालाचे नुकसान टाळण्यासाठी साहित्य हलवण्याकरिता काही अवधी देण्यात यावा, अशी विनंती काझी यांनी केली. त्यांच्या या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत काही काळ कारवाई थांबवली. यामुळे व्यापाऱ्यांना आपले सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आवश्यक वेळ मिळाला. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने ही मोहीम राबवल्याने शहरात याची मोठी चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3367428
Share This Article