GRAMIN SEARCH BANNER

मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (जेएनपीए) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक, खासगी व्यक्ती व संस्थांनी ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची बाब केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीत उघड झाली आहे.

याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भ्रष्टाचार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सीबीआयने मुंबई व चेन्नई येथे पाच ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे.

जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार मदभावी (पीपी डब्ल्यूडी), टीसीईचे प्रकल्प संचालक देवदत्त बोस, मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स (मुंबई), मे. बोस्कालीसस्मीत इंडिया (मुंबई) व मे. जान दे नुल ड्रेगिंग (चेन्नई) व इतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

जेएनपीएच्या तत्कालीन अधिकारी आणि दोन खासगी कंपन्यांनी संगनमत करून गुन्ह्याचा कट रचला. त्यात दोन कंपन्यांचाही सहभाग होता. याप्रकरणी सीबीआयने जून २०२२ मध्ये प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

तक्रारीनुसार, आरोपी कंपन्यांना न्हावा शेवा येथील जेएनपीटी येथील जहाजांना येण्या-जाण्याच्या मार्गातील खोली वाढवण्याचे कंत्राट दिले होते. तर, या प्रकल्पासाठी एका खासगी सल्लागार कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमले होते.

खोट्या दाव्यांच्या आधारे रक्कम अदा

प्रकल्पाच्या टप्पा-१ मध्ये मार्गांची खोली वाढवण्यासह गाळ काढण्यात आला. यावेळी खोट्या दाव्यांच्या आधारावर ३६५ कोटी ९० लाख रुपये देण्यात आले. पहिल्या टप्प्यात २०१० ते २०१४ दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यात २०१२ ते २०१९ दरम्यान कामे झाल्याचे दाखवले.

दोन्ही टप्प्यांमधील २०१२ ते २०१४ हा देखभालीचा कालावधी सारखाच होता. त्यानंतरही त्या काळात ४३८ कोटींची अतिरिक्त रक्कम दिली. त्यावरून पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात कोणतेही अतिरिक्त खोदकाम अथवा गाळ काढण्याचे काम झाले नसतानाही मोठ्या प्रमाणात रक्कम दिल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

आणखी काही जण रडारवर

सीबीआयने याप्रकरणी मुंबई आणि चेन्नईतील पाच ठिकाणी छापे टाकले. त्यात जेएनपीएच्या अधिकाऱ्याचे निवासस्थान, सल्लागार कंपनीचे कार्यालय आणि खासगी कंपन्यांच्या कार्यालयाचा समावेश आहे.

या छाप्यांमध्ये कॅपिटल ड्रेजिंग प्रकल्पाशी संबंधित दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे हस्तगत केले. सर्व दस्तऐवजांची तपासणी सुरू आहे. आणखी काही जण सीबीआयच्या रडारवर असून, यातून काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor

0217753
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *