मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रोरो बोट सेवा सुरू करण्याचा मानस मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मात्र ही रो रो बोट थांबण्यासाठी मालवण, रत्नागिरीत जेट्टीच उपलब्ध नसल्याने रोरो सेवेचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोकणवासीयांना आताच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. यावेळी काहींनी रोरो बोट सेवेने मुंबई ते मालवण प्रवास करण्याचा बेत आखला आहे. मात्र तो या वर्षी तरी अशक्य वाटत आहे. मुंबईतील डोमेस्टिक क्रूक्ष टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या या जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून अवघ्या साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग, तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.
ही बोट सेवा गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. मात्र प्रवासी बोटीसाठी जेट्टीची उभारणी होणे गरजेचे आहे. त्या जेट्टी तयार झाल्या की ही बोटसेवा सुरु होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. रत्नागिरीला अद्यापहीजेट्टी तयार करण्यात आलेली नाही. तर जयगडमध्ये जेट्टी आहे, तिथे रोरोची बोट लागण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे आणि ती सुविधा गणेशोत्सवापूर्वी अशक्य आहे.
अशी आहे रोरो बोट
रो-रो एम2एम कंपनीची ही हायटेक बोट एखाद्या क्रुझप्रमाणे असून तिची किंमतच 55 कोटी इतकी आहे. या अत्याधुनिक बोटीत 500 प्रवासी आणि 150 वाहने ठेवण्याची क्षमता आहे. बोटीचा वेग 24 नॉटिकल माईल्स इतका असून मुंबई ते मालवण अवघ्या 4 तासांत पार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने कोकणात जाण्यासाठी लागणार्या 10 ते 12 तासांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी वेळ लागणार आहे.
मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग दरम्यान रोरोच्या चाचण्या
एम2 एम व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दुसर्या रोरो बोटीच्या चाचण्या केवळ मुंबई ते मांडवा या जलवाहतूक मार्गावर झाल्या आहेत. मुंबईतील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते मांडवा दरम्यान रोरो बोटीची चाचणी झाली असून, येत्या काही दिवसांत सदर बोटीच्या मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग दरम्यान चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यानंतर सदर मार्गावर बोट चालविण्याचा परवाना मिळणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
नितेश राणे, मत्स्य, बंदर विकास मंत्रीराज्याच्या मत्स्य व बंदरे विभागाच्या वतीने रोरो बोट सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा मानस आहे. यांसंदर्भात सागरी महामंडळ आणि एमटूएम कंपनीशी करार झाला आहे. गणेशोत्सवाच्या आधीच ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. रोरो बोट ही विशेषत: चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी उपयुक्त सेवा ठरणार आहे.
कोकण रोरो सेवेचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकणार?

Leave a Comment