पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. मिरवणूक आता सकाळी एक तास अगोदर म्हणजे साडेनऊ वाजता सुरू करून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने काढण्यात येणार आहे.
सर्व मंडळांकडून एकमताने हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत या प्रश्नावर तोडगा काढला.
यंदा काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोकप्रतिनिधी, सर्व मंडळांशी चर्चा करून २५ ऑगस्टपर्यंत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी सर्व मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेत मिरवणुकीबाबत निर्णय घेतला.
पुण्यात सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार गणेश विसर्जन मिरवणुका
