लांजा : जोर जबरदस्तीने वाडीवस्तीलगत राबविण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंड व नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने १४ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण छेडण्यात येणार आहे.
वारंवार अर्ज विनंती तसेच आंदोलने, उपोषणे करून देखील प्रशासन आपला हट्ट सोडत नसल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही शासकीय निकषात न बसणारी अशी ही जागा असताना देखील नगरपंचायतीकडून आचारसंहितेच्या काळात या डम्पिंग ग्राउंड साठी जागा खरेदी करण्यात आली होती.
सदर डम्पिंग ग्राउंड प्रकल्प अगदी लोक वस्तीलगत म्हणजे लोक वस्तीपासून अगदी १८० ते २०० मीटरवर असून कोणताही अधिकृत पोहोच मार्ग नसताना देखील तो राबवला जात असल्याने याचा त्रास हा भविष्यात येथील वाडीवस्तीला होऊन येथील वाडी उध्वस्त होणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून या डम्पिंग ग्राउंड विरोधात रणशिंग पुकारलेले आहे. सातत्याने ग्रामस्थांकडून आंदोलने, उपोषण केली जात आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसीलदार, पोलीस प्रशासन यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदने देखील सादर केलेली आहेत. मात्र तरी देखील नगरपंचायतीकडून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यापूर्वी डम्पिंग ग्राउंड हटावसाठी ग्रामस्थांच्यावतीने ८ जुलै रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील छेडण्यात आले होते. मात्र या उपोषणाची प्रशासनाकडून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे. नगरपंचायत जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवू पाहत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावण्याचा लांजा नगरपंचायतीचा प्रयत्न असून त्यांचा हा कुटील डाव आम्ही हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
आमच्या मुळावर येणारा हा धोकादायक डम्पिंग प्रकल्प रद्द होत नाही किंवा तो अन्य ठिकाणी स्थलांतरीत होत नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी लढा देणार असून याच अनुषंगाने १४ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण छेडले जाणार आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले जाणार आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच या आंदोलनाची सर्व जबाबदारी ही नगरपंचायत प्रशासनाची राहील असा इशाराही ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.
लांजातील डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांचे १४ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण
