१९० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Gramin Varta
218 Views

धुळे: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील आणखी एका कथित आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ४५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या आयडींच्या माध्यमातून वेतन आणि थकबाकीच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोणताही वैध प्रशासकीय प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप आहे. या मान्यतेच्या आधारे बनावट शालार्थ आयडी तयार करून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १,२०० जणांचा सहभाग असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी काही अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून त्यांचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धुळे येथे सापळा रचून शशिकांत हिंगणीकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिक येथे आणून औपचारिक अटक करण्यात आली.

दरम्यान, १९० कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाशिक शहर गुन्हे शाखेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून गैरव्यवहाराची व्याप्ती आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Total Visitors :
4585042
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *