पुणे: ‘विद्यानंद बापट तुम बढो हम तुम्हारे साथ है’, ‘हम सब एक है, लढेंगे जितेंगे’ आणि ‘लोकशाही जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणाबाजी करत पुणेकरांनी गुडलक चौक येथील कलाकार कट्टावर शुक्रवारी ( दि.४) सायंकाळी एकत्र येत विद्यानंद बापट यांच्यावरील मारहाणीचा आणि संतोष पंडित यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. या आंदोलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांच्यातर्फे या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी संतोष पंडित व विद्यानंद बापट यांच्या समर्थनाचे फलक झळकावून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
पुणे शहर काँग्रेस पूर्व विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव म्हणाले, शहरात घडणाऱ्या चुकीच्या घटनांच्या निषेधार्थ आम्ही येथे आलो आहोत. विद्यानंद बापट यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यावर मारहाण झाली आहे. केवळ एका मंत्र्याला वाईट वाटले म्हणून संतोष पंडित यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. ज्यांना टीका आणि विरोध सहन होत नाही, त्यांनी राजकारणात राहू नये.
हे दोघेही वैयक्तिक कामासाठी लढत नव्हते. ज्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांचा पंडितांशी काहीही संबंध नाही. ते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत होते. अशा प्रकारे काम करणाऱ्यांना प्रशासन आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून रोखले जात असेल, तर त्याचा निषेध होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत समाज माध्यम प्रभावक अरुण जाधव यांनी व्यक्त केले.
आम्ही संतोष पंडित आणि विद्यानंद बापट यांच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्याबाबत झालेली कारवाई आणि विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रमुख दीप्ती म्हणाल्या. वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे अक्षय जैन, अक्षय कांबळे, सिद्धांत जांभूळकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सतीश जोशी, तसेच प्रेरणा सिंगनजुडे, प्रणव काथवटे, सुष्मिता हरणे, साहेबराव क्षीरसागर, ओम शिंदे, प्रीती लोंढे, शिव परमार, नितीन आंधळे, अथर्व सोनार, अभिजीत गोरे व श्रावणी बुआ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
भाजप समर्थकांचा हस्तक्षेप; काही काळ तणावाचे वातावरण
आंदोलन सुरू असताना अचानक भारतीय जनता पक्षाचा समर्थक या आंदोलनामध्ये आला. त्याने भाजप समर्थनात घोषणाबाजी केली. त्यामुळे आंदोलक आणि भाजप समर्थकात काही क्षणांसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मध्यस्थी केली आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी शांत करत भाजप समर्थकाला बाजूला केले.
‘विद्यानंद बापट तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ म्हणत पुणेकरांनी मारहाणीचा केला निषेध
Leave a Comment





