राजापूर : तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार सात महिन्यांपासून थकीत असलेल्या लाखो रुपयांच्या कमिशनमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासन व प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कमिशनचे अनुदान मिळालेले नसल्याने, “आश्वासन अन् तारीख पे तारीख” अशीच परिस्थिती राहिली आहे. त्यामुळे घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानांचे भाडे यासाठी निधी उभारणे दुकानदारांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रास्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांना धान्य पुरवते. त्याबदल्यात शासनाकडून दुकानदारांना कमिशन स्वरूपात मोबदला दिला जातो. सध्या तालुक्यात सुमारे शंभर रास्त धान्य दुकाने कार्यरत असून, गावोगाव लाभार्थ्यांना धान्यपुरवठा करण्याचे काम नियमित सुरू आहे.
मात्र, नोव्हेंबर २०२४ पासून मे २०२५ पर्यंत सात महिन्यांचे लाखो रुपयांचे कमिशन अद्याप शासनाकडून दिले गेलेले नाही. याच दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांनी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे लाभार्थ्यांना पोहोच केले. त्या खर्चाचीही भर या थकीत कमिशनमध्येच पडली आहे.
कमिशन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने अनेक दुकानदार पूर्णपणे या रकमेवर अवलंबून आहेत. मात्र, सात महिने उलटून गेले तरी, रकमेचा पत्ता नाही. त्यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयांतील बदल आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती ओढवली असून, दुकानदार आर्थिक संकटातून कधी सावरतील, याबाबत अनिश्चिततेची भावना व्यक्त करत आहेत.
सात महिने कमिशन थकल्यामुळे राजापुरातील रास्त धान्य दुकानदार आर्थिक संकटात
