सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांच्या सचिव (रस्ते) यांना तातडीच्या सूचना
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या संगमेश्वर- पाटण घाटमार्ग कामाला गती मिळावी म्हणून घाटमार्ग समन्वय समिती चे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर- म्हैसकर यांची दि.१ ॲाक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयात भेट घेऊन त्यांना तशा आशयाचे पत्र देवून विनंती केली. सार्वजनिक बांधकाम विभाग या घाटमार्ग कामासाठी सकारात्मक असून या घाटमार्ग मंजूरीचे प्रशासकीय काम प्राधान्याने करण्याच्या तातडीच्या सूचना अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी यावेळी श्री. संजय दशपपुते सचिव ( रस्ते ) यांना केल्या आहेत.
संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. ( Monarch Surveyors And Engineering Consultants LTD ) या कंपनीला देण्यात आले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. विहीत मुदतीत या कंपनीने डीपीआर शासनाला सादर करुन प्रशासकीय मान्यता प्रक्रीया पार पाडत या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी विनंती यावेळी संतोष येडगे यांनी केली. संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. २०.१०० कि.मी एकेरी रस्ता पुर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरु होणार आहे. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
डीपीआरसाठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता. संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब, करंबेळे, वाशी,धामणी ,तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. संगमेश्वर- पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या युती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक जनता आग्रही आहे.
संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाला प्राधान्याने गती द्या






