GRAMIN SEARCH BANNER

प्रगतशील शेतकरी गंगाधर ढोल्ये यांचे वृद्धापकाळाने निधन

Gramin Varta
167 Views

संगमेश्वर  ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर उर्फ नाना ढोल्ये (  ९८ ) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले.

गंगाधर उर्फ नाना ढोल्ये हे संगमेश्वर तालुक्यात एक प्रगतशील शेतकरी म्हणून सर्वांना परिचित होते. आंबा, काजू , सुपारी, काळी मिरी , विविध प्रकारचा भाजीपाला , हळद लागवड, नागकेशर असे विविध प्रकारचे व्यवसाय त्यांनी गेली अनेक वर्षे यशस्वीपणे केले. सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे त्यांनी दुग्ध व्यवसायही केला. कितीही उंच झाड असेल तरी त्या झाडावर चढण्याची कला नाना यांना अवगत होती. सतत कष्ट करत राहणे हेच त्यांचे ब्रीद होते. तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून आदर्श घ्यावा,असे विविध प्रकारचे प्रयोग ते शेतीमध्ये सातत्याने करत असत.

गेले चार दिवस रक्तदाब कमी होत असल्याने त्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ होती. मात्र अखेरपर्यंत ते सर्वत्र हिंडते  फिरते होते. अखेरीस शुक्रवारी दुपारी ३:४५ च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. असुर्डे येथील स्मशानभूमीत रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी असुर्डे गावासह आजूबाजूच्या अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. नाना ढोल्ये यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, एक विवाहित मुलगी, नातवंड, नात सुना , पणतवंड असा मोठा परिवार आहे.

Total Visitor Counter

3369384
Share This Article