महाड : तालुक्यातील दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावर आज (मंगळवार) दुपारी सुमारास मांडवकर कोंड गावाजवळ पुणे फौजी अंबवडे अहिरे कोंड (ता. महाड) ही एस.टी. बस घसरून अपघात झाला. या अपघातात बस चालक व वाहकासह १० प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुणे (पिंपरी चिंचवड) आगाराची एम.एच.०७ सी. ९०४३ क्रमांकाची एसटी बस मांडवकर कोंड गावाजवळ आली असता, रस्त्यावर असलेल्या चिखलामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस घसरून अपघात घडला. बसमधील १० प्रवासी जखमी झाले असून, त्यात काही गंभीर स्वरूपाचे आहेत.
बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून महिला वाहकाच्या हातालाही मोठी इजा झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड एस.टी. आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे तसेच शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.
जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे:
१. अविनाश पांडुरंग लोखंडे (३४), राह. पिंपरी चिंचवड – चालक
२. पौर्णिमा प्रमोद होनकडसे (४६), राह. पुणे – महिला वाहक
३. आशाबाई नारायण जाधव (७५), राह. फौजी अंबवडे
४. शारदा गजानन शेलार (६७), राह. फौजी अंबवडे
५. सोहम ज्ञानेश्वर पवार (१७), राह. फौजी अंबवडे
६. सिमाब सिकंदर पेडेकर (१६), राह. शिरवली
७. सलवा अब्दुल सलाम पेडेकर (१७), राह. शिरवली
८. आराधना दिगंबर पवार (१८), राह. फौजी अंबवडे
९. लहू सखाराम पाते (५५), राह. पांगरी
१०. विश्वजीत सोपान कदम (२७), राह. शिरवली
सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून एस.टी. महामंडळाने किरकोळ जखमी प्रवाशांना तात्पुरते आर्थिक सहाय्य दिले आहे.
स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी
महाड-दापोली मार्गावर अनेक ठिकाणी चिखलामुळे रस्ता निसरडा झालेला असून, वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत. आगामी गणेशोत्सव काळात या मार्गावरील वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एस.टी. बसला भीषण अपघात : चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी
