खेड : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात मोहम्मद शाकीर अब्दुल हमीद शेख (वय २३) आणि आमान आरिफ शेख (वय १४, दोघे रा. शांतीनगर-भिवंडी) हे दोघे जखमी झाले.
कंटेनर (MH-01/EW-0675) भोस्ते घाटातून खाली येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला (MH-10/Z-1737) धडक दिली. या धडकेत कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, विनायक कदम आणि अक्षय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य हाती घेतले. दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहनांमध्ये एसटी बसेसह अनेक खासगी वाहनेही अडकली होती.
घटनेची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून नियंत्रण मिळवले. कंटेनर आणि ट्रक बाजूला हटवल्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक काही वेळाने पूर्ववत झाली.
खेडमधील भोस्ते घाटात कंटेनर-ट्रक अपघातात दोघे जखमी; वाहतूक काही काळ ठप्प
