GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात उसनवारीच्या पैशातून कोयतीच्या लाकडी मुठीने डोक्यात प्रहार, एकावर गुन्हा

Gramin Varta
13 Views

चिपळूण – उसनवारीच्या पैशांच्या वसुलीसाठी गेलेल्या एका तरुणावर कोयतीच्या लाकडी मुठीने हल्ला झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी पाग बौध्दवाडी येथे घडली. या हल्ल्यात अल्पेश जयराज पवार (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपी तेजस सावंत याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पेश पवार यांनी आरोपी तेजस सावंत याला काही रक्कम उसनवारीने दिली होती. ही रक्कम परत मिळवण्यासाठी अल्पेश, तेजसच्या घरी गेला होता. दुपारी सुमारे सव्वा एक वाजताच्या सुमारास अल्पेशने तेजसला त्याच्या घरासमोरून हाक मारली. अल्पेशला पाहताच तेजस हातात कोयता घेऊन घराबाहेर आला आणि त्याने अल्पेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी, तेजसने शिवीगाळ करत अल्पेशशी झटापट केली आणि त्याच्या हातातील कोयत्याच्या लाकडी दांड्याने अल्पेशच्या डोक्याच्या उजव्या बाजूला जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात अल्पेश गंभीर जखमी झाला. “तुला खल्लास करून टाकीन,” अशी धमकीही आरोपीने यावेळी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी अल्पेश पवार याला तातडीने चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. अल्पेशने दिलेल्या तक्रारीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी तेजस सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2651278
Share This Article