दापोली : तालुक्यातील शिरसिंगे मराठवाडी येथील बेपत्ता ५३ वर्षीय प्रौढाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२५) सकाळी आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप बाळकृष्ण सावंत (वय ५३, रा. शिरसिंगे मराठवाडी) हे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. अखेर दोन दिवसांनंतर, म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गावातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला.
ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. सध्या या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दापोली : बेपत्ता प्रौढाचा विहिरीत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
