खेड : तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे समोर आले आहे. लेखापरीक्षण अहवालात हा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि काही कर्मचाऱ्यांसह एकूण १६ जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विनोद वामनराव अंड्रस्कर (वय ५४) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तसेच त्यापूर्वीच्या काळात पतसंस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. संस्थेचे लेखापरीक्षण (ऑडिट) करताना हा घोटाळा उघडकीस आला. या गैरव्यवहारामुळे पतसंस्थेचे ३,७९,६०,६०९ रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय, पतसंस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट मुदत ठेव पावत्या (फिक्स्ड डिपॉझिट रिसिट्स) छापून ठेवीदारांची ४३ लाख २० हजार ४१२ रुपयांची फसवणूक केली.
दोन्ही रक्कम मिळून एकूण ४,२२,८१,०२१ रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर गुन्ह्यात पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बाळा बैंकर, उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया योगेश सुतार, कॅशियर अभिजीत रमेश नलावडे, लिपिक रुपेश चंद्रकांत गोवळकर आणि इतर १० संचालकांसह एकूण १६ जणांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०९, ४०६, १२० (ब), ३४, ४६७, ४६५ तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (V.A.Hit.R.Adhi) कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.२४ वाजता दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये धोक्यात असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.