संगमेश्वर : गणेशोत्सव काळात इतरांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा उत्सव मागे टाकणाऱ्या पोलीस दलाने, सर्व ड्युटी संपल्यानंतर आपल्या वसाहतीतील गणपती बाप्पाचे विसर्जन थाटामाटात केले. संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या गणेशमूर्तीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात पार पडली.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग घेतला. परंपरेप्रमाणे, दरवर्षी इतर सर्व गणपतींचे विसर्जन पार पडल्यावरच पोलीस वसाहतीच्या गणपतीचे विसर्जन केले जाते.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, त्यामुळे पोलीसांना स्वतःच्या घरगुती उत्सवात वेळ देता येत नाही. यामुळे वसाहतीतील गणपतीचाच उत्सव त्यांच्यासाठी आनंदाचा मोठा आधार ठरतो. विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचारी पारंपरिक पोशाखात, नाचत-गात सहभागी झाले आणि सर्वांनी मिळून आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
यंदाही हा सोहळा उत्साह, शिस्त आणि सामूहिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला.