रत्नागिरी– रत्नागिरीच्या मध्यवर्ती बसस्थानकातील कार्यालयात सरकारी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण नसताना आरोपीने अधिकाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात अधिकाऱ्याचे कपडे फाटले असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही गहाळ झाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (वय ५६) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, रत्नागिरी आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी ते बसस्थानकातील कार्यालयात बसून आपले सरकारी काम करत होते.
त्याचवेळी आरोपी निखिल चंद्रशेखर नार्वेकर (वय ३६, रा. गोळपसडा) हा अचानक कार्यालयात आला. कोणताही वाद नसताना, त्याने प्रद्युम्न शिरधनकर यांची मानेवरील शर्टची कॉलर पकडली आणि “तुला माज आला आहे, तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,” अशा शब्दांत धमकी देत शिवीगाळ केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शिरधनकर यांच्या मानेवर व पाठीवर हाताच्या ठोशाने मारहाण केली आणि त्यांची मान टेबलावर दाबून धरली.
या हल्ल्यात शिरधनकर यांच्या अंगातील शर्ट आणि बनियन फाटले. तसेच, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढल्याने ती तुटून गहाळ झाली. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.