▪️गांग्रई कला कार्यशाळेत साकारली अनोखी चित्रं
▪️निसर्गा सोबत रमले कलाकार
संगमेश्वर दि. १३ ( प्रतिनिधी ):- कलाकाराचा कुंचल्यात जादू असते. या जादू मागे कलाकाराचे अथक परिश्रम दडलेले असतात. जेवढा सुंदर निसर्ग असतो तेवढीच सुंदर कलाकृती साकारण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे गावचे प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी त्यांच्या जादूई कुंचल्यातून चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथील सुंदर निसर्ग आपल्या कलाकृतीत साकारला आहे.
चिपळूण तालुक्यातील गांग्रई निसर्ग पर्यटन येथे माजी आमदार सदानंद चव्हाण आणि ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांच्या संकल्पनेतून राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून नामवंत चित्रकार चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथे कला कार्यशाळेसाठी दाखल झाले होते. नामवंत कलाकारांसाठी अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करायची ही दुसरी वेळ होती. गतवेळच्या कार्यशाळेत असणारे कलाकार आणि यावेळी उपस्थित असणारे कलाकार हे वेगवेगळे होते. या कार्यशाळेला ४५ पेक्षा अधिक नामवंत कलाकार उपस्थित रहाणे ही कोकणसाठी अभिमानाची बाब ठरली.
या कार्यशाळेत सहभागी असणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट हे गेली तीस वर्षे जलरंगात काम करत असून सातत्यपूर्ण सरावामुळे त्यांनी जलरंगावर जबरदस्त प्रभूत्व मिळवलं आहे. त्यांची जलरंग शैली प्रवाही, मोजक्या रंगांची, टवटवीत आणि प्रभावी अशी आहे. त्यांची निसर्ग चित्रं हुबेहूब असल्यामुळे रसिक त्यांच्या कलाकृती पाहून मनोमन सुखावून जातो. विष्णू परीट यांच्या जलरंग निसर्ग चित्रांची आजवर अनेक प्रदर्शने झाली असून त्यांच्या चित्रांना राज्यस्तरावरील विविध पारितोषिकं प्राप्त झाली आहेत. गांग्रई येथे परीट यांनी तीन दिवसात एकूण चार कलाकृती साकारल्या. या सर्व कलाकृतींच उपस्थित कलाकारांनी कौतुक केलं.
▪️कलाकारांना संधी ही कलेप्रती असणारी कृतज्ञता !
कोकणच्या कलाकारांसह राज्याच्या विविध भागातील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना एकत्र करून चिपळूण तालुक्यातील गांग्रई सारख्या निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाच्या विविध रूपांचे रेखाटन करायला मिळणे, ही कलाकारांसाठी खूप मोठी संधी होती. यामुळे विविध कलाकारांच्या शैलींचा अभ्यास करता आला. या कार्यशाळेतून खूप काही शिकायलाही मिळाले. माजी आमदार सदानंद चव्हाण आणि ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के सर यांनी कलाकारांना अशी संधी प्राप्त करून दिली , ही कलेप्रती त्यांच्या मनात असणारी कृतज्ञताच आहे.
—— विष्णू परीट, निसर्गचित्रकार सोनवडे, संगमेश्वर
चित्रकार विष्णू परीट यांच्या कुंचल्यातून अवतरला निसर्गाचा अद्भुत आविष्कार !
