चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील कुंभारवाडी स्टॉप निसर्ग हॉटेलजवळ टेम्पोने दिलेल्या धडकेत स्कुटीवरील पती पत्नी दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ०९.१५ वाजताच्या सुमारास घडली. धडक देणारा टाटा इन्ट्रा टेम्पो पलटी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत फिर्यादी सायली संतोष नलावडे (वय २६, रा. शिरगाव नवीन वसाहत, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती संतोष गणपत नलावडे (वय २७) हे त्यांची टी.व्ही.एस. एनटॉर्क स्कुटी (एम.एच.०८ ए.यु. ४७२०) घेऊन शिरगावहून खेर्डीकडे कराड-चिपळूण रोडने जात होते. त्याचवेळी टेम्पो चालक आरोपी राजेश दत्ताराम पवार (रा. कोंडफणसवणे, ता. चिपळूण) हा त्याच्या ताब्यातील टाटा इन्ट्रा टेम्पो (एम.एच.०८ ए.पी. ४५९३) चिपळूणकडून कराड रोडने भरधाव वेगाने घेऊन येत होता. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता राजेश पवारने समोरून येणाऱ्या एका मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात संतोष नलावडे यांच्या स्कुटीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सायली नलावडे यांच्या हाताला आणि उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले, तर त्यांचे पती संतोष यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर धडक देणारा टाटा इन्ट्रा टेम्पो पुढे जाऊन पलटी झाला. या अपघातात स्कुटी आणि टेम्पो दोघांचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमी पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी राजेश दत्ताराम पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूणजवळ टेम्पोची स्कुटीला जोरदार धडक, पती-पत्नी गंभीर
