रत्नागिरी ः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील अपहार करण्यात आलेल्या 50 लाखांच्या 504.34 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा म्हणजेच 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहितेने हे दागिने ’मुथ्थूट फायनान्स’ चिपळूण अर्बन बँक आणि आयआयएफएल या फायनान्स कंपनीत तारण ठेवून त्यातून तब्बल 35 लाखांचे कर्ज काढले होते.
बँकेचा संशयित शिपाई अमोल मोहिते याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत नागरिकांनी तारण म्हणूने ठेवलेले तब्बल 50 लाखांचे 504.34 ग्रॅम सोन्याचे दागिने कॅशियर ओंकार कोळवणकर आणि शाखाधिकारी किरण बारये याच्याशी संगनमत करून बँकेच्या तिजोरीत न ठेवता परस्पर लांबवले होते. हा अपहार त्यांनी 18 फेब्रुवारी 2025 ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत केला होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातच या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ पोलिस काँ. सतीश राजरत्न व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी अमोल मोहितेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अपहार कलेले दागिने शहरातील चिपळूण अर्बन बँक,मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीत तारण ठेवून त्यावर कर्ज काढल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी नोटीस जारी करुन सदर दागिने अपहार प्रकरणातील असल्याची माहिती तिन्ही बँकांना कळवली. चिपळूण अर्बन बँकेने आपल्याकडील दागिने पोलिसांच्या स्वाधिन केले.परंतु, त्यातील मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीने आपल्याकडील दागिने परत करण्यास नकार देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांनी दागिन्यांची केलेली मागणी योग्य अल्याचा निर्वाळ देत दोन्ही बँकांना अपहार प्रकरणातील दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते.
हस्तगत दागिन्यांचे वजन 577.94 ग्रॅम
जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपहारित करण्यात आलेल्या सर्व दागिन्यांचे मूळ वजन 577.94 ग्रॅम आहे. परंतू ज्यावेळी बँक हे दागिने आपल्याकडे तारण ठेवते त्यावेळी 24 कॅरेट शूध्द सोन्याचे वजन करुनच कर्ज देण्यात येते. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार देताना अपहारीत सोन्याच्या दागिन्यांचा तपशिल देतेवेळी बँकेने 24 कॅरेट शुध्द सोन्याचे भरलेले वजन 504.34 ग्रॅम वजनाचे दागिने अपहारित झाल्याची तक्रार दिली होती.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहारातील 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
