रत्नागिरी: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतजमिनीचा पुन्हा एकदा लिलाव होणार असून, येत्या ४ नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया पार पडेल. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स (SAFEMA) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मालमत्तांसाठी एकत्रितपणे सुमारे २० लाख रुपयांची राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.
या लिलावात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुम्बके गावातील तीन शेतजमिनीच्या प्लॉट्सचा समावेश आहे. यामध्ये १०,४२० चौ.मी. जमिनीसाठी ९.४ लाख रुपये, ८,९५३ चौ.मी. जमिनीसाठी ८ लाख रुपये आणि २,२४० चौ.मी. शेतजमिनीसाठी २.३ लाख रुपये इतकी राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये याच गावातील चार प्लॉट्सचा लिलाव झाला होता, ज्यात दाऊदच्या आईच्या नावावरील दोन जमिनींचा समावेश होता. त्यावेळी १७१ चौ.मी. शेतजमिनीसाठी चक्क २.०१ कोटी रुपयांची विक्रमी बोली लागली होती, मात्र प्रत्यक्ष व्यवहार फक्त ३.२८ लाख रुपयांचाच झाला. उच्च बोली लावणाऱ्याने नंतर केवळ एकाच प्लॉटसाठी पैसे भरले. त्यामुळे तेव्हा विकल्या न गेलेल्या मालमत्ता आणि काही तांत्रिक कारणांमुळे पुन्हा लिलावात आलेल्या जमिनी आता पुन्हा एकदा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेतून सरकारला सुमारे २० लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. ४ नोव्हेंबरला होणाऱ्या या लिलावात कोणत्या बोली लागतात आणि या मालमत्ता कोणाच्या नावावर होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.