बीड: “आम्ही शांततेत मुंबईला जाणार आहोत आणि शांततेतच मराठा समाजाचे आरक्षण घेणार आहोत. हे संकट आता मोडून काढायचे आहे. सत्ता येते-जाते, पण समाजाचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आहे.
पुढे आपण विचारांनी चालायचे आहे. जीव गेला तरी मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे”, असे बीड येथील आयोजित सभेत मराठा आरक्षण मागणीसाठी आग्रही नेते मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारले जात असून, यावेळी ते अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत. जरांगे पाटील यांनी ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येकी 500 रूपये प्रमाणे वर्गणी गोळा केली आहे. शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान तीन चार वाहने काढण्याची तयारी केली आहे. येत्या 27 तारखेला मराठा तरूण गावागावातून बाहेर पडणार आहेत. त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील. अशी रणनिती आखण्यात आली आहे.
सभेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “बीडमध्ये आमच्या सभेत अडथळे निर्माण केले जातात. थांबा, आम्ही मुंबईत येतोय, तेव्हा काय करायचे ते करा. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला मुंबईला यायची गरजच नाही,”असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी मराठा समाजातील तरुणांचे नुकसान होत असल्याची खंतही व्यक्त केली. “आपल्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करून घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही म्हणून पिढ्यानपिढ्या नुकसान झाले. यापुढे आपण दिशादर्शक मार्गावरून जायचे आहे,”असे ते म्हणाले.
सभेत डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यावर भाष्य करताना जरांगे म्हणाले, “बीडमध्ये मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही. यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही.”
आता मराठा समाजाचा निर्धार ठाम असून, मुंबईतील मोर्चातून आरक्षण मिळविल्याशिवाय परतायचे नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जीव गेला तरी मागे हटणार नाही; गुलाल उधळूनच परतायचे – मनोज जरांगे
