आगामी जि.प,पं.स निवडणुका लढवायच्या की नाहीत यावर विचार करण्यासाठी गाव विकास समितीकडून ‘निवडणूक निर्णय कमिटीचे’ गठन
संगमेश्वर: शहरी आणि ग्रामीण भागात काही राजकीय नेत्यांनी पैशांच्या राजकारणाची सवय लावली असून, गाव पातळीवरही स्वार्थी हेतूने पैशांचे राजकारण सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनाढ्य उमेदवारांकडून पैशांचा वापर झाला. यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला राहिले. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या नागरिकांना भविष्यात पश्चात्ताप होईल. पैशांच्या राजकारणामुळे सामान्य माणसाला निवडणूक लढवणे अवघड होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका संगमेश्वर तालुक्यात लढवाव्या की नाही, यावर विचार करण्यासाठी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेने ‘निवडणूक निर्णय कमिटी’ स्थापन केली आहे.
गाव विकास समितीच्या कोअर कमिटीने घेतलेल्या या निर्णयानंतर, निवडणूक निर्णय कमिटी ग्रामीण भागातील निवडणुकांच्या सध्याच्या पद्धतीचा सखोल आढावा घेणार आहे. ही कमिटी आपला अहवाल संघटनेच्या नेतृत्वाकडे सादर करेल. या अहवालानंतर गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे पुढील योग्य निर्णय घेतील.
निवडणूक निर्णय कमिटीमध्ये राहुल यादव, मंगेश धावडे, मुझमिल काझी, सुरेंद्र काबदुले, ऍड.सुनील खंडागळे,सतेश जाधव आणि महेंद्र घुग यांचा समावेश आहे.
या कमिटीच्या आढाव्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असेल:
गावातील तरुण वर्ग आणि सुशिक्षित नागरिकांनी पैशांच्या राजकारणाला बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यावी का?
गावांच्या विकासात पैशांचे राजकारण मारक ठरत आहे का?
पैसे आणि आमिषांचे राजकारण होत असताना ‘मतदार राजा आहे’ ही लोकशाहीतील भूमिका अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नाही का?
पैशांच्या राजकारणाचा फटका विकासाला बसतो, यावर काय पद्धतीने जनजागृती करता येईल?
गावांच्या समस्या, महत्त्वाचे प्रश्न जसे की आरोग्य, शिक्षण, आणि रोजगार याकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुकीत मिळणाऱ्या पैशांसाठी मतदान होणार असेल, तर विकासाचे राजकारण करून काय फायदा, असा प्रश्न गाव विकास समितीने उपस्थित केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गाव विकास समितीने उच्चशिक्षित उमेदवार अनघा कांगणे यांना उमेदवारी दिली होती. रोजगार शिक्षण, आरोग्य,पायाभूत सुविधा, हॉस्पिटल असे मुद्दे प्रचारात आणूनही पैशांचे राजकारण या निवडणुकीत वरचढ ठरले होते. जर पैसे खर्च करणारेच निवडणुका जिंकणार असतील, तर विकासाचे व्हिजन घेऊन लढणाऱ्या गाव विकास समितीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संगमेश्वर तालुक्यात लढवायच्या की नाहीत, यावरही ही निवडणूक निर्णय कमिटी गाव विकास समितीच्या नेतृत्वाला अहवाल सादर करणार आहे.
येत्या एका महिन्यात ही कमिटी आपला आढावा पूर्ण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे. या अहवालानंतर गाव विकास समिती काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.