मुरुड – गेल्या दोन-चार दिवसांपासून मुरुड परिसरात जोरदार पाऊस पडत असून, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच मुसळधार पावसामुळे मुरुड कोळीवाडा परिसरातील मामा पेटकर यांच्या वाडीत एक दुर्दैवी घटना घडली. येथे नारळाचे एक मोठे झाड कोसळून गुरांचा गोठा जमीनदोस्त झाला आहे. सुदैवाने, या गोठ्यात बांधलेली एक पारडी आणि एक वासरू बचावले, मात्र या घटनेत पेटकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी एकच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्याचवेळी अचानक एका नारळाचे झाड कोसळले आणि ते थेट मामा पेटकर यांच्या गुरांच्या गोठ्यावर पडले. झाड पडल्यामुळे संपूर्ण गोठा कोसळला. त्या क्षणी गोठ्यात एक पारडी व एक वासरू होते. झाड पडल्यानंतर लागलीच स्थानिकांनी धाव घेतली. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणेच नशीब बलवत्तर असल्यामुळे दोन्ही जनावरे सुखरूप बाहेर काढण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोठा जमीनदोस्त झाल्याने पेटकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला योग्य ती मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.