राजन लाड /जैतापूर : जैतापूरमध्ये ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्ताने निघालेल्या जुलूसात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश पाहायला मिळाला. जैतापूर जमातूल मुस्लिम कमिटीच्या वतीने जामा मशिदीपासून काढण्यात आलेला जुलूस जैतापूर एसटी स्टँड परिसरात पोहोचला असता जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या वेळी सर्व सहभागी हिंदू-मुस्लिम बांधवांना सरबताचे वाटप करण्यात आले. सागरी पोलीस ठाणे, नाटे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ आपल्या सहकाऱ्यांसह या स्वागत कार्यक्रमाला उपस्थित राहून धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले. त्यांनीही दोन्ही समाज बांधवांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
या जुलूसात जमातूल मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष जलाल काजी, ज्येष्ठ नागरिक शरफुद्दीन काजी, माजी अध्यक्ष सरफराज गुलामहुसेन काजी, रिजवान काजी आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वागतावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जुलूसाचे स्वागत केले.
सकाळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांनी जलाल काजी व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुता आणि धार्मिक सलोखा यांचे दर्शन घडवणारा ठरला.
जैतापूरमध्ये ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात संपन्न
