GRAMIN SEARCH BANNER

मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अल्पसंख्याक महिलांच्या मदतीला जाकीर शेकासन धावले!

रत्नागिरी: मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन सरसावले आहेत. त्यांनी या पीडित महिलांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक आयोग, मुंबईकडे तक्रार दाखल केली असून, या महिलांना निर्णय होईपर्यंत कर्जवसुलीस स्थगिती मिळावी अशी मागणी केली आहे.

या तक्रारीची अल्पसंख्याक आयोग राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण यांनी तातडीने दखल घेतली आहे. बुऱ्हाण यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांना महिलांना त्रास देऊ नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना जाकीर शेकासन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जामुळे अडचणीत आल्या आहेत. या कंपन्यांकडून वसुलीसाठी अनेकदा जाचक अटी आणि त्रासदायक पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे महिला मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक आयोगाला वैधानिक दर्जा असून दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. त्यामुळे आयोगाच्या आदेशाला कायदेशीर महत्त्व आहे. वसीम बुऱ्हाण यांनी दिलेल्या आदेशामुळे कर्जवसुलीसाठी महिलांवर दबाव आणणाऱ्या कंपन्यांना आता लगाम बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याक समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी उचललेल्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी आयोगाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article