GRAMIN SEARCH BANNER

विधवा, एकल महिलांसाठी चविका टी स्टॉलचे वाटप; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन

रत्नागिरीत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील : पालकमंत्री

रत्नागिरी : देवरुखातील चक्रभेदि फाउंडेशनने विधवा, गरीब, एकल महिलाना सक्षम करण्यासाठी टी स्टॉल चे वाटप करण्याचे ठरवले. त्यादृष्टीने १२ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील साळवी स्टॉप, मा. बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात चविका चहा टी स्टॉल योजनेअंतर्गत प्राथमिक सात महिला लाभार्थींना स्टॉलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, ही योजना अत्यंत चांगली असून महिलाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहे.यासाठी रत्नागिरीत आमचे पूर्ण सहकार्य असेल.

फेब्रुवारी २०२५ पासून रक्षितम अग्रोनिक्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि चक्रभेदी सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विधवा व एकल महिलांना मोफत टी स्टॉल शॉप देण्याचे आवाहन करण्यात आले होते. एकूण २० अर्ज संस्थेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी १७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

१६ व १७ एप्रिल २०२५ रोजी चिपळूण, लांजा, संगमेश्वर व रत्नागिरी या ठिकाणी कंपनीचे अनुशील मेढे तसेच संस्थेच्या वैदेही सावंत व आश्लेषा इंगवले यांनी प्रत्यक्ष लाभार्थी व व्यावसायिक ठिकाणाची पाहणी केली होती. या आधारे सात लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. जयादेवी अनुशील मेढे व अंतप्रेरक मा. अनुशील मेढे यांनी पालकमंत्री मा. उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर औपचारिक उद्घाटन फीत कापून करण्यात आले.

योजनेचे महत्त्व आणि महिला नेतृत्वाचे गौरवोद्गार

माजी नगरसेविका व शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मा. शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या योजनेचे कौतुक करताना सांगितले की, ही योजना महिलांना रोजगाराची संधी देणारी असून अनुशील मेढे यांचा सेवाभाव खरोखरच प्रेरणादायी आहे. चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी स्वतः फोन करून या योजनेची माहिती दिली आणि मी तत्काळ काही एकल महिलांची नावे संस्थेकडे पाठवली, असे त्यांनी नमूद केले.

कंपनीचे उद्दिष्ट आणि भविष्यातील दृष्टीकोन

मा. अनुशील मेढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रत्नागिरीतील पाहणीत लाभार्थी महिलांनी सामंत साहेब आमच्या पाठीशी आहेत, असे सांगितले आणि त्यामुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली. सध्या २० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून भविष्यात ५०० महिलांपर्यंत या उपक्रमाचा विस्तार करायचा आहे. महिलांनी या टी स्टॉलमधून महिन्याला २५ ते ३० हजार कमवावे, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लाभार्थ्यांची नावे

शीतल शंकर सावंत (चिपळूण), दीपाली दिनकर गावडे (रत्नागिरी), रुचिता रविंद्र सुर्वे (रत्नागिरी), पूजा अंकुश सुर्वे (चिपळूण), दिपाली नरेंद्र विचारे (सावर्डा), समीक्षा गुरुनाथ सावंत (रत्नागिरी), संपदा प्रमोद सावंत (रत्नागिरी) या महिलांना टी स्टॉलचे वाटप करण्यात आले.

मा. नगरसेवक शशिकांत मोदी, परशुराम स्वयंरोजगार सहकारी संस्था, चक्रभेदी संस्थेचे सल्लागार मा. रावसाहेब चौगुले, आश्लेषा इंगवले, रागिणी यशवंतराव, प्रमोद पालवे यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले. सुनील बेंडखळे यांनी संगमेश्वरी बोलीतील प्रहसन सादर करून कार्यक्रमात हास्याची फोडणी दिली.

पुढील टप्प्यासाठी आवाहन

कार्यक्रमाच्या शेवटी चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, अजून ज्या विधवा व एकल महिलांना टी स्टॉल हवे असतील त्यांनी संस्थेकडे अर्ज करावा.

Total Visitor

0224718
Share This Article