रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख सवलतधारकांकडे एनसीएमसी कार्ड; उर्वरितांनी १ ऑगस्टपूर्वी नोंदणीचे आवाहन

Gramin Varta
215 Views

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी) कार्ड बंधनकारक करण्यात आले असून, १ ऑगस्टपासून कार्ड नसलेल्या सवलतधारकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व अन्य सवलतधारकांनी तातडीने स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक लाख सवलतधारकांनी एनसीएमसी कार्ड प्राप्त केले असून, अद्याप सुमारे सहा लाख लाभार्थींनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आगामी कालावधीत बसस्थानकांवरील नोंदणी केंद्रांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बोगस आधारकार्डांच्या आधारे सवलतीचा लाभ घेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधारऐवजी एनसीएमसी कार्डची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन महिन्यांपूर्वी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. रत्नागिरी बसस्थानकासह विविध ठिकाणी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी सुरू असून मोठ्या प्रमाणात सवलतधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी कार्ड नोंदणीसाठी गर्दी कमी झाली होती. मात्र, १ ऑगस्टपासून कार्ड अनिवार्य होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर पुन्हा एकदा सवलतधारकांची गर्दी वाढू लागली आहे.

दरम्यान, राज्यभरात सुमारे ५१ लाख सवलतधारकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी २५ लाख कार्डांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कार्डांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात चार हजारांहून अधिक वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच कार्ड वितरणासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

Total Visitors :
4576961
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *