GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: रिक्टोली येथे वृद्धाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
152 Views

चिपळूण:  अलोरे शिरगाव परिसरात रिक्टोली येथील सारगेची डाग नदीच्या पुलाजवळ एका वळणावर एस.टी. बसने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा जण जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ०१/१०/२०२५ रोजी सकाळी साधारण ०८.०० वाजण्याच्या सुमारास घडला. एस.टी. बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४८५० ही तिवरेहून पिंपरी चिंचवड, पुणे येथे जात होती. ही बस चालक राहुल संदिपान कोरडे (वय ४१, रा. पिपरी चिंचवड, पुणे) हे चालवत होते. अपघाताच्या ठिकाणी, म्हणजेच पुलाच्या अलीकडील वळणावरील दिशादर्शक फलकाजवळ, बस चालकाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि बेदरकारपणे बस चालवली.

या भरधाव आणि अनियंत्रित बसने समोरून चिपळूणहून तिवरे गावाकडे जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम.एच. ११ एन. ५२४२ हिला जोरदार ठोकर दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात दुचाकीवरील स्वार गणेश पांडुरंग शिंदे (वय ३८, रा. तिवरे गावठाण) आणि त्यांच्या पाठीमागे बसलेले जयवंत बाबाजी शिंदे (वय ५७, रा. तिवरे गावठाण) यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. दुर्देवाने, या अपघातात जयवंत बाबाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश शिंदे हे जखमी झाले.

या घटनेनंतर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार केशव हनुमंत मुटगर यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दिनांक ०८/१०/२०२५ रोजी रात्री  गुन्हा दाखल केला आहे. एस.टी. चालक राहुल कोरडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गु.आर. क्र. ६२/२०२५ नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निष्काळजीपणे वाहन चालवून एका निष्पाप नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल एस.टी. चालकावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3200134
Share This Article