दापोली: दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एसटी वाहकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २५३८ ही कोंडे-करंजाणी येथून दापोलीकडे येत होती. यावेळी बस चालक आशिष रामचंद्र मळेकर आणि वाहक शिवनाथ बन्शी नाकाडे हे आपले सरकारी कर्तव्य बजावत होते. बस उर्दू शाळेजवळ आली असता, रस्ता देण्याच्या कारणावरून आरोपी शेखर चंद्रकांत कालेकर, रंजित राजेंद्र यादव आणि साहिल इरशाद शार्दुला यांनी बस अडवून चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहक शिवनाथ नाकाडे यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी फिर्यादी शिवनाथ नाकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, १२१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. लोकसेवकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.






