दापोली: तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष श्रीपत साळवी (वय ६३, सध्या रा. कांदिवली, मुंबई) यांचे करंजाणी दर्भाचीवाडी येथे मूळ घर आहे. त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली फिर्यादी यांच्या दिवंगत आईची १ लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ (सुमारे ३ तोळे) आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ (४ ग्रॅम) असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी २७ मार्च २०२६ पूर्वी घडली असून, या घटनेची रीतसर तक्रार १३ मे रोजी दापोली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये चोरीचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील बंद घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






