GRAMIN SEARCH BANNER

गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ९० दिवसात पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय

Gramin Varta
3 Views

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवार दि. 6 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, पुंगाव ता. राधानगरी येथील श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासक मंडळ नेमणे यासाठी राज्य सरकारच्या नव्या कायद्यातील तरतूद ग्राह्य मानली या विरोधात असलेल्या या याचिकेवर काल आणि आज अशी दोन दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची याचिका मंजूर केली.

या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच; गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदललेला होता, त्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच; या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे व हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाला दिले आहेत.

आता ९० दिवसाच्या आत निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोकूळची अंतिम मतदार यादी तयार करणे आवश्यक आहे पण यामध्ये अवसायानातील ११०८ आणि इतर अशा वादग्रस्त सभासद संस्था बाबत सहकार उप निबंधक दुग्ध यांचेकडे सुनावण्या सुरु आहेत. यामध्ये सर्व वादग्रस्त संस्थाचे म्हणणे घेऊन त्यांच्या पात्र-अपात्रतेबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. त्यासाठी या सर्व संस्थाच्या सुनावण्या पूर्ण होऊन निर्णय दिल्यानंतरच अंतिम मतदार यादी तयार होणार. त्यानंतर निवडणूकीची प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे. हे सर्व 90 दिवसात पूर्ण करणे संबधीत यंत्रणेसाठी अव्हानात्मक आहे. संचालक मंडळाला मुदतवाढ आणि प्रशासक मंडळ नियुक्ती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत त्यानुसार संचालक मंडळाची याचिका दाखल झाली तर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि वडकशिवालेतील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे हे काय भुमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे

काल व आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲड. मुकुल रोहतगी यांनी श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. श्री. तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने ॲड. श्री. धर्माधिकारी यांनी काम पाहिले.

Total Visitor Counter

3364990
Share This Article