राजापूर : तालुक्यातील मौजे ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली असून, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी संजय गोविंद ताम्हाणकर (५६, रा. ताम्हाणे, ताम्हणकरवाडी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पुतण्या सिद्धेश श्रीधर ताम्हाणकर हा आरोपी मनोहर सोमा ताम्हाणकर यांच्या घरी गेला होता. त्यावेळी मनोहर ताम्हणकर आणि त्यांची पत्नी मनिषा मनोहर ताम्हणकर यांनी सिद्धेशला शिवीगाळ करत दमदाटी केली.
ही गोष्ट समजताच संजय ताम्हणकर, त्यांचा मोठा भाऊ श्रीधर गोविंद ताम्हणकर, मुलगा साहिल संजय ताम्हणकर आणि पुतण्या संतोष श्रीधर ताम्हणकर हे सर्वजण घटनास्थळी पोहोचले. याचवेळी आरोपी नामदेव गोविंद ताम्हणकर, त्यांची पत्नी अनिता नामदेव ताम्हणकर, नंदकिशोर सुरेश ताम्हणकर आणि मंगेश सुरेश ताम्हणकर हे देखील तिथे जमा झाले.
या सर्व आरोपींनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव तयार करत दंगा केला. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदारांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना हाताने मारहाण केली. यावेळी आरोपी मनोहर सोमा ताम्हणकर आणि मनिषा मनोहर ताम्हणकर यांनी ‘तुम्हाला मारून खड्यात पुरून टाकतो’ अशी धमकीही दिली, असे फिर्यादींनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर फिर्यादी संजय ताम्हणकर यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मनोहर सोमा ताम्हणकर (६७), मनिषा मनोहर ताम्हणकर (६२), नामदेव गोविंद ताम्हणकर (५४), अनिता नामदेव ताम्हणकर (५०), नंदकिशोर सुरेश ताम्हणकर (३२) आणि मंगेश सुरेश ताम्हणकर (२९) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
राजापूरमध्ये जमीन वादातून कुटुंबांत तुंबळ हाणामारी; 6 जणांवर गुन्हा
