GRAMIN SEARCH BANNER

अंत्रवलीच्या सुपुत्राची गगनभरारी: ऋषिकेश सुर्वे यांना मुंबई विद्यापीठाची ‘रसायनशास्त्रात’ Ph.D

Gramin Varta
139 Views

संगमेश्वर/संदेश जिमन: संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावाचे सुपुत्र ऋषिकेश राजारामराव सुर्वे यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच.डी. (Ph.D.) ही सर्वोच्च पदवी संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उत्तुंग शैक्षणिक यशामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अंत्रवलीसारख्या ग्रामीण भागातून मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतून रसायनशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात ही उच्च पदवी मिळवणे, हे ऋषिकेश यांच्या कठोर मेहनत, सातत्य आणि दुर्दम्य जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे.

पीएच.डी. पदवी मिळाल्यानंतर आपल्या यशाबद्दल बोलताना ऋषिकेश सुर्वे यांनी नम्रपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “या ज्ञानसाधनेत मला मिळालेले यश हे केवळ माझ्या एकट्याचे नाही. गुरुजन, आई-वडील यांचे मौलिक मार्गदर्शन, आशीर्वाद आणि प्रेरणा यामुळेच मी हा टप्पा गाठू शकलो,” असे प्रतिपादन त्यांनी केले. आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे उच्च शैक्षणिक उद्दिष्ट साधू शकलो आणि आपल्या गावाचा लौकिक वाढवण्याचे भाग्य लाभले, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

ऋषिकेश यांच्या या देदीप्यमान यशामुळे समस्त अंत्रवली गावाचे रहिवासी आनंदी झाले आहेत. गावात उत्साहाचे वातावरण असून, हा तरुण संशोधक आपल्या गावासाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. ज्ञान, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे ऋषिकेश यांनी सिद्ध केले आहे.भविष्यातील त्यांच्या वाटचालीस व संशोधनास ग्रामस्थ, शिक्षक आणि हितचिंतकांकडून भरभरून शुभेच्छा व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3377258
Share This Article