पुणे : पुण्याजवळील खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवळ शैक्षणिक प्रयोगांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना दुपारची डुलकी घेऊ देण्याच्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आली आहे. ‘टी फोर एज्युकेशन’ या लंडनमधील संस्थेने घेतलेल्या जागतिक पातळीवरील ‘सर्वोत्तम शाळा’ स्पर्धेत या शाळेने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. काही वर्षांपूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही सरकारी शाळा आता जागतिक स्तरावर झळकल्याने राज्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
काय आहे हा अभिनव उपक्रम?
मध्यंतरीच्या सुट्टीत, डबे खाल्ल्यानंतर इतर शाळांमध्ये मुलांचा गोंगाट ऐकू येत असताना, जालिंदरनगर शाळेत मात्र शांतता असते. इथे जेवणाच्या सुटीनंतर मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते. अनेक मुले आपल्याच हाताची उशी करून डोकं टेकवतात, तर काही जण दप्तरातून आणलेलं पांघरूण अंगावर घेऊन जमिनीवर शांतपणे झोपतात. वर्गाच्या बंदिस्त भिंती आणि बाकांची शिस्त बाजूला ठेवून, कण्हेरसर गावाजवळच्या या शाळेतील मुले दररोज डबा खाल्ल्यानंतर चक्क अर्धा तास झोपतात. मुलांना हवी असणारी ही मोकळीकता दिल्यास ते किती बहरू शकतात, हेच या सरकारी शाळेच्या यशातून दिसून येत आहे.
जागतिक स्पर्धेत यश
जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केवळ दुपारच्या झोपेचाच नाही, तर इतर अनेक सृजनशील कल्पना, विविध प्रयोग आणि शिक्षणाच्या नव्या शक्यतांना वाव दिला आहे. याच कारणामुळे ‘टी फोर एज्युकेशन’ या संस्थेच्या ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात या शाळेने सहभाग घेतला होता. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील शेकडो शाळांमधून जालिंदरनगरच्या या शाळेची निवड झाली आहे. बुधवार, १८ जून रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
पुढील टप्पा आणि बक्षीस
स्पर्धेच्या पुढील टप्प्यात आता ऑनलाईन मतदानाद्वारे या दहा शाळांमधून सर्वोत्तम शाळा निवडली जाईल. या स्पर्धेतील विजेत्या शाळेला तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. लोकांच्या आधारासोबतच एखादी शाळा मुलांना हवी असणारी मोकळीकता देऊ शकली, तर किती प्रगती होते, हेच जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या यशातून दिसून येते, असे वारे यांनी सांगितले.
आशियातून निवडलेल्या शाळांमध्ये भारताचा मान
स्पर्धेच्या ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात आशिया खंडातून पाकिस्तानमधील बीकनहाउस कॉलेज प्रोग्रॅम, जुनिपर कॅम्पस आणि नॉर्डिक इंटरनॅशनल स्कूल लाहोर या दोन शाळांची निवड झाली आहे. यासोबतच भारतातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळाही आशिया भागात निवडलेल्या शाळांमध्ये समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त लॅटिन अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आणि उत्तर अमेरिका येथील विविध शाळांनीही या टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.
मुलांना शाळेत झोपू देणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा; विद्यार्थ्यांना शाळेतच मिळते दुपारची डुलकी!
