खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या प्रकरणात खेड पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मोठे यश मिळवले आहे. सातत्याने होत असलेल्या मंदिर चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत खेड पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला मोठा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
शिरगाव, कुळवंडी, एनवरे, कशेडी तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तीस गावांमधील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत होत्या. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करत खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा माग काढला. या कारवाईदरम्यान मंदिरांमधून चोरीस गेलेल्या सुमारे ८०० किलो वजनाच्या घंटा व समई असा मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई ए पी आय रोहिदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक महिने सुरू असलेल्या या गुन्हेगारी प्रकाराला आळा घालण्यात खेड पोलिसांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेड पोलिसांचा जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहीबोले आणि भाजप रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अॅड. मिलिंद नांदगावकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशाच प्रकारची कार्यतत्परता कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
खेड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.





