GRAMIN SEARCH BANNER

वांझोळे बावनदी पुलाचा संरक्षक कठडा तातडीने दुरुस्त करा- नितीन गोताड

Gramin Varta
75 Views

गाव विकास समितीचे जिल्हाधिकाऱ्याना पत्र

देवरुख: देवरुख-साखरपा या मुख्य रहदारीच्या मार्गावरील वांझोळे येथील बावनदी पुलाचा संरक्षक कठडा एका बाजूने सुरवातीला तुटला असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वाझोळे पंचक्रोशी गाव विकास समितीचे संघटक व माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देवरुख ते साखरपा हा मार्ग संगमेश्वर तालुक्यातील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून एसटी बसेस, अवजड वाहने आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी वाहतूक असते. मात्र, वांझोळे येथील बावनदी पुलाचा सुरुवातीचाच संरक्षक कठडा गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. पुलाला एका बाजूने संरक्षण तुटले असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात वाहन चालकांचा अंदाज चुकून वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात नितीन गोताड यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पुलाची दुरवस्था होऊन बराच काळ लोटला असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. हा प्रवास सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे,” असे गोताड यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, या पुलाचा संरक्षक कठडा तातडीने युद्धपातळीवर दुरुस्त करावा आणि तोपर्यंत तेथे रिफ्लेक्टर्स किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात यावेत.

भविष्यात या ठिकाणी कोणताही दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही नितीन गोताड यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुख यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.आता यावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3236100
Share This Article