राजन लाड/जैतापूर :राजापूर तालुक्यातील मीठगवाने येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील महिलांची एकजूट अधोरेखित करणारा “नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू” हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. सिद्धी विनायक शिर्सेकर व त्यांच्या समविचारी महिला मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत सांस्कृतिक कला केंद्र, श्री देव अंजनेश्वर देवालय शेजारी हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. महिलांचा विशेष सन्मान करून त्यांना नारीशक्तीचे प्रतीक म्हणून गौरविण्यात आले, तर पारंपरिक हळदीकुंकू समारंभाद्वारे समाजातील एकोप्याचा संदेश देण्यात आला. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत महिलांनी संवादातून सामाजिक बांधिलकी आणि एकत्रित पुढाकाराचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रस्ताविक व सूत्रसंचालन आशा काजवे यांनी केले. जैतापूर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री नारे यांनी मार्गदर्शन केले. आमदार किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या, तर दिवाकर आडवीरकर गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश काजवे, अजित नारकर, प्रशांत गावकर, शशांक शिरवडकर, धनंजय कांबळी, नरेश आंबेरकर, सुबोध मांजरेकर, प्रसाद करगुटकर व संतोष जैतापकर यांनी सहकार्य केले. तसेच आयोजिका सिद्धी विनायक शिर्सेकर यांच्यासोबत आशा काजवे, प्रांजली गावकर, सम्राज्ञी शिरवडकर, साक्षी शिरवडकर, चित्रा रांबाडे, मयुरी दुधवडकर, पल्लवी भाटकर, सुजाता तांबे तसेच विविध बचत गटांच्या सीआरपींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
सौ. सिद्धी विनायक शिर्सेकर म्हणाल्या, “नवरात्र म्हणजे नारीशक्तीची आराधना. या निमित्ताने महिलांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपली पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो.”
या उपक्रमातून पंचक्रोशीतील महिलांनी एकजूट, परंपरा, सन्मान आणि समाजकारणातील सक्रिय सहभाग यांचा ठसा उमटवत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला.
नवरात्र उत्सवानिमित्त मीठगवाने येथे ‘नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
