GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : चिपळूण कराड मार्गावरील पुल गेला वाहून ; मार्ग बंद, वाहनांच्या मोठ्या रांगा

चिपळूण: गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक आज सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली. कोयनानगर ता.पाटण जवळील वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेला पर्यायी रस्ता सोमवारी सकाळी पाण्याच्या तडाख्याने वाहून गेला.त्याचा फटका वाहनधारकांना बसला आहे.

वाजेगाव येथे मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराकडून मोरी टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यासाठी ठेकेदाराने मातीचा वापर केला होता. मात्र काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना महापूर आल्याने पाण्याचा जोरदार लोंढा मोरीवर धडकला आणि ती वाहून गेली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक वाहने ठिकठिकाणी अडकली आहेत.

कराड-चिपळूण महामार्गाचे गेल्या २ वर्षांपासून काम सुरू असून अजूनही मुख्य पूल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरच संपूर्ण वाहतूक सुरू होती. मात्र या रस्त्याचा दर्जा अत्यंत हलका असल्याने अवघ्या काही तासांतच तो वाहून गेला आहे. सध्या या मार्गावर प्रवास करणे धोकादायक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने या रोडवर छोटी वाहने पर्यायी मार्गाने जाऊ शकतात. मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गाने बंद करण्यात येत आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article