गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश; दर शनिवारी करणार महामार्गाची पाहणी
चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, एकूण ३५५ किलोमीटरपैकी ३३४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे महामार्गाचे ९३.१८ टक्के काम पूर्णत्वास गेले असून, उर्वरित २१.१९ किलोमीटरचे कामही या वर्षाअखेर पूर्ण होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत यांनी महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, महिला आघाडीच्या प्राजक्ता टकले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महामार्गावरील खड्डे त्वरित भरून काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. स्वतः रत्नागिरी ते चिपळूण प्रवास करून त्यांनी महामार्गाची पाहणी केली. आरवली ते कांटे या रखडलेल्या भागात काही खड्डे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या खड्ड्यांचे मोजमाप घेऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
महामार्गाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रगतीचा सतत आढावा घेता यावा यासाठी पालकमंत्री दर शनिवारी चिपळूण येथे येऊन महामार्गाची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त, संगमेश्वर बसस्थानकासमोरील टपऱ्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवरही तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महामार्ग पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.