तंटामुक्तीत महिलेला पैसे देण्याचे केले होते कबूल, मात्र त्यांनाही मारले फाट्यावर
राजापूर: तालुक्यातील एका गावातील उपसरपंचाने विधवा महिलेचे अडचणीच्या काळात घेतलेले पैसे व दागिने वेळेत परत न करता फसवणूक केली आहे. पैशासाठी तगादा लावूनही पैसे देत नसल्याने या महिलेने आमदार किरण सामंत यांच्याकडे धाव घेतलीं आहे.
आंबेरकोणी येथील संगीता अशोक धुमाळ यांनी आमदाराना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गावातील उप सरपंचाला गरजेच्या वेळी माणुसकी म्हणून दागिने व पैसे दिले होते. त्या उप सरपंचाने व त्यांच्या बायकोने “आज देतो, उद्या देतो” असे सांगून त्यांना केवळ आशेवर ठेवले आहे.
धुमाळ यांनी वारंवार दागिने आणि पैशांची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यांनी मोबाईलवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्या दांपत्याने त्यांचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आहे. त्यामुळे धुमाळ यांना त्यांच्या घरी जाऊनही पैसे आणि दागिन्यांची मागणी करावी लागली. मात्र तरीही हा निगरगट्ट उप उप सरपंच पैसे देण्यास तयार नाही. शेवटी कंटाळलेल्या धुमाळ यांनी तंटामुक्त समीतीकडे तक्रार केली.
यापूर्वी या प्रकरणी तंटामुक्ती आणि पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असता, त्या दांपत्याने सहा महिन्यांत पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र कालावधी उलटूनही पैसे व दागिने दिलेले नाहीत. सध्या धुमाळ यांना त्यांच्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी पैशांची तातडीची गरज आहे. त्यांनी त्या दांपत्याला रोख रक्कम त्वरित देऊन दागिने सहा महिन्यांत देण्याची मागणी केली आहे, परंतु कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे वैतागलेल्या धुमाळ यांनी आमदाराना विनंती केली आहे, जर दागिने आणि पैसे परत मिळाले नाहीत, तर आपल्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. असे काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या उप सरपंच आणि त्याच्या बायकोची राहील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
संगीता धुमाळ यांनी आमदार किरण सामंत यांना विनंती केली आहे की, त्यांनी या दोन्ही व्यक्तींना राजापूर येथील कार्यालयात बोलावून आपले दागिने आणि पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आणि आपल्याला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
गरिबांच्या हाकेला धावणारे आणि आपला शब्द हेच आपले वचन असणारे आमदार किरण सामंत या महिलेला न्याय मिळवून देणार का? हे लवकर दिसून येईल.
राजापुरातील एका उपसरपंचाने विधवा महिलेचे दागिने व पैसे लुटले, महिलेची आमदारांकडे धाव
