GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप

Gramin Varta
226 Views

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील तत्काळ तिकीटविक्री कक्षात उघडपणे काळाबाजार सुरू असून त्याला थेट रेल्वे कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप भाजप शिष्टमंडळाने केला आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्यात आला नाही, तर रेल्वेस्थानकाबाहेर सनदशीर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला.

भाजपचे पदाधिकारी सतेज नलावडे, दीपक आपटे, नितीश अपकरे व योगेश गराटे यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या एक ते दोन महिन्यांपासून तत्काळ तिकीटविक्री कक्षात आधीच भरलेले अर्ज दगडाखाली लपवून ठेवले जात आहेत. संबंधित एजंट आयत्यावेळी येऊन हे अर्ज सादर करतात आणि पहिल्या क्रमांकावर तिकीट मिळवतात. त्यामुळे दोन ते तीन तासांपासून रांगेत उभे असलेले सामान्य प्रवासी मागे पडतात.

सामान्यतः पहिल्या एक-दोन क्रमांकांनाच तत्काळ तिकीट मिळणे अपेक्षित असताना, या काळाबाजारामुळे तिकिटे एजंटांकडे जात असून ती चढ्या भावाने विकली जात आहेत. तत्काळ एसी तिकिटांच्या अधिकृत दरापेक्षा तब्बल ४०० रुपयांहून अधिक दराने तिकिटांची विक्री रत्नागिरीत सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकाराविरोधात प्रवाशांनी आवाज उठवला, तर संबंधित रेल्वे तिकीट कर्मचारी रेल्वे पोलिसांना बोलावून नागरिकांनाच दमात घेत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी काळाबाजार रोखणे अपेक्षित असताना, तेच त्याला सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ही बाब विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, लवकरच रेल्वेमंत्र्यांकडेही तक्रार सादर केली जाईल, असे भाजपच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366943
Share This Article