GRAMIN SEARCH BANNER

कुणबी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरणारे ‘किसान भवन’ लोकार्पण

Gramin Varta
181 Views

स्वखर्चातून उभारलेली वास्तू समाजाच्या विकासासाठी समर्पित : उदय सामंत

रत्नागिरी : राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात; मात्र जनतेने दिलेला विश्वास आणि प्रेम जपणे हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कुणबी समाजाने नेहमीच आपल्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली असून, या समाजाच्या कष्टावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था उभी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ, खालगाव येथे उभारण्यात आलेल्या भव्य ‘किसान भवन’च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे, हे किसान भवन कोणत्याही शासकीय निधीशिवाय, पूर्णतः स्वतःच्या उत्पन्नातून आणि स्वखर्चातून उभारण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

या भवनाच्या उपयुक्ततेविषयी माहिती देताना सामंत म्हणाले की, खालगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकरी व तरुणांसाठी हे भवन विकासाचे केंद्र ठरेल. येथे केवळ सभा-संमेलनेच नव्हे, तर आधुनिक शेती तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, फळबाग लागवड आणि शेतीपूरक व्यवसायांबाबत नियमित कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कुणबी समाजातील तरुणांसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचाही आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून उच्च पदांवर पोहोचावेत, हेच आपले स्वप्न असल्याचे सामंत यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी जाकादेवी परिसरातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.

सामाजिक बांधिलकीतून उभारलेली ही वास्तू आता समाजाच्या ताब्यात असून, तिचे पावित्र्य जपून समाजहितासाठी योग्य वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.

Total Visitor Counter

3366867
Share This Article