अलिबाग : शहरात भरवस्तीत अलिबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत एका घरावर शनिवारी पहाटे 5.30 वाजता छापा घालून तब्बल 11 लाख 30 हजार 100 रुपये दर्र्शींनीमुल्याच्या बनावट भारतीय नोटा आणि या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरत असलेले साहित्य जप्त केले आहे.
35 वर्षीय आरोपीचे नाव भूषण विजय पतंगे असे असून मयेकर लाईन येथे राहातो. त्यांने आपल्या घरातच प्रिंटर आणि स्कॅनरच्या साहाय्याने बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी भूषण विजय पतंगे यास अटक करण्यात आली असून, त्यास संध्याकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे, बळीराम केंद्रे, तसेच पोहवा विलास आंबेतकर, परेश म्हात्रे आणि पोशि अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे यांनी ही कारवाई केली आहे.
भूषण पतंगे हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही अलिबाग व श्रीवर्धन येथे चोरी व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी भूषण पतंगेच्या घराची झडती घेतली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट चलन आणि नोटा बनवण्याचे साहित्य आढळले. त्याच बरोबर 100, 200 आणि 500 रुपये दर्शनीमुल्याच्या 4 लाख 16 हजार 100 रुपये किंमतीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.
भूषण पतंगे यास अटक केल्यावर कबुलीनंतर केलेल्या पंचनाम्यात 500 रुपये दर्शनीमुल्याच्या 7 लाख 14 हजार रुपये किमतीच्या आणखी 500 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.एकूण जप्त बनावट नोटा दर्शनीमुल्य 11 लाख 30 हजार 100 रुपये आहे. त्याच बरोबर बनावट नोटांच्या आकाराचे 300 पांढर्या कागदांचे तुकडे, चुकीच्या साईजमध्ये छापलेल्या आणि अर्धवट छापलेल्या नोटा, धारदार ब्लेड असलेला कटर, नोटा छापण्यासाठी वापरलेला कलर प्रिंटर व स्कॅनर आणि आरोपीच्या अंगझडतीत मिळालेला काळ्या रंगाचा मोबाईल फोन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आपल्या घरातील प्रिंटर आणि स्कॅनरच्या सहाय्याने या बनावट नोटा छापल्या होत्या. हा प्रिंटर त्याने दुरुस्तीसाठी दिला असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. जरम्यान काही बनावट नोटा आधीच बाजारात वापरल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. पोलिस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
पोलीसांचे आवाहन
कोणत्याही व्यवहारात प्राप्त होणार्या नोटा नीट तपासून घ्याव्यात. एखादी बनावट नोट मिळाल्यास घाबरू नका, ती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करा आणि तपासात सहकार्य करा. ही कारवाई अलिबाग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली असून, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात बनावट चलनाच्या वाढत्या प्रवृत्तीवर मोठा आळा बसणार आहे, असे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.
अलिबाग: घरातच ’बनावट नोटा निर्मीताचा कारखाना’
