GRAMIN SEARCH BANNER

तळेकांटे येथे भरधाव कंटेनरची विजेच्या खांबाला धडक, पोल तुटला, कंटेनर चालकावर गुन्हा

संगमेश्वर : रत्नागिरी ते संगमेश्वर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने ३८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, चालकाच्या बेजबाबदार कृत्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तळेकाटे पोस्ट ऑफिसजवळ घडली. अशोक लेलँड कंपनीचा (एम.एच. ४३ सी.के. ५८६४) हा कंटेनर रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंटेनरचा चालक राम भजन (रा. तळमजला, संगमनगर, गणेश गल्ली, वडाळा, मुंबई) हा रस्त्याची स्थिती लक्षात न घेता भरधाव वेगाने कंटेनर चालवत होता. यामुळे, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ११ किलोव्होल्टच्या वांद्री वाहिनीच्या लोखंडी पोलवर आदळला.

अपघाताच्या तीव्रतेमुळे विजेचा खांब पूर्णपणे तुटला. याबरोबरच, तारा, व्ही क्रॉस आर टॉप क्लॅम्प, जि.आय. फ्लॅट, स्टे क्लॅम्प आणि डेंजर बोर्ड यांचेही मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचा अंदाजित खर्च ३७ ते ३८ हजार रुपये इतका असल्याचे वीज कंपनीने सांगितले आहे.

या घटनेनंतर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादी अंकुश विजयराव कौरवार (वय ४७, व्यवसाय – बी.ई. इलेक्ट्रीकल, मूळ छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राम भजन या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

2474942
Share This Article