सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांची जोडी ही हिंदू–मुस्लिम एकतेचे आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक
क्रांतिकारक शिक्षिका फातिमा शेख यांचा आदर्श समाजाने घेण्यासारखा:- नाझीमा बांगी(गोलंदाज)
संगमेश्वर: न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेड बू येथे आज क्रांतिकारक शिक्षिका फातिमा शेख यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव केला. सावित्रीमाई फुले यांच्या खांद्याला खांदा देत फातिमा शेख यांनी या देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपली जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळेच भारतात स्त्री शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात झाली, असे वक्त्यांनी सांगितले.
सामाजिक बहिष्कार, अपमान आणि हालअपेष्टा सहन करत सावित्रीमाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी स्त्री मुक्तीच्या लढ्यासाठी स्वतःला झोकून दिले. शिक्षण देताना त्यांच्यावर शेणगोळे फेकले जात असतानाही त्या डगमगल्या नाहीत, हे त्यांच्या कार्याचे मोठे उदाहरण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांची जोडी ही हिंदू–मुस्लिम एकतेचे आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे. सावित्रीमाई फुले यांच्याइतकाच फातिमा शेख यांच्या कार्याचाही गौरव होणे आवश्यक आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास भाकर संस्थेचे देवेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, उपाध्यक्ष सलाउद्दीन बोट, संचालक सलीम सय्यद, मुख्याध्यापीका नाझिमा बांगी, सुजेन आलजी, सिमरन मालदार, आसिफा मालगुंडकर, कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, कुदसिया मोडक, विदिशा कांबळे,शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.






