GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी मिरजोळे जि. प. गटात ‘ठाकरे’ सेनेच्या 3 पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा; कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या वाटेवर?

Gramin Varta
376 Views

रत्नागिरी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे असतानाच रत्नागिरी तालुक्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मिरजोळे जिल्हा परिषद गटातील तीन प्रमुख शिलेदारांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वैभव पाटील (विभागप्रमुख), डॉ. मयुरेश पाटील (उपविभागप्रमुख) आणि शुभानंद पाटील (विभाग संघटक) या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत पक्षाचे काम करणे शक्य नसल्याचे कारण देत आपले राजीनामे सादर केले आहेत.

नगरपालिका, नगरपंचायत आणि विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असताना मिरजोळे सारख्या महत्त्वाच्या गटातून हे तगडे पदाधिकारी बाहेर पडणे हा ठाकरे गटासाठी मोठा सेटबॅक मानला जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही पदाधिकारी केवळ वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडले नसून, ते आपल्यासोबत १० ते १५ निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी घेऊन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच शिंदे गटाने ही मोठी खेळी खेळून ठाकरे गटाला जबरदस्त शह दिल्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. या संभाव्य बंडामुळे मिरजोळे गटातील जुनी राजकीय समीकरणे पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय भूकंपामुळे भविष्यातील राजकीय निकाल कोणत्या बाजूने झुकणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Total Visitor Counter

3073151
Share This Article